यंदाच्या गाळप हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून, यातील पन्नास टक्के साखरेची विक्री झाली आहे. तर पन्नास टक्के साखर कारखान्यांच्या गोदामांत पडून आहे. नगर जिल्ह्यातील सहकारी व खासगी कारखान्यांकडे ८ लाख टन साखरसाठा विक्रीविना पडून आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. हा दर तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आला आहे. आणखी थोडा दर वाढल्यानंतर ही साखर विक्रीसाठी बाजारात येणार आहे.
यंदाच्या गाळप हंगामात देशात विक्रमी साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचे दर कोसळले होते. नगर जिल्ह्यातील खासगी व सहकारी अशाब बावीस कारखान्यांनी तब्बल १५ लाख टनांचे साखर उत्पादन केले होते. तर २०१६-१७ या हंगामातील एक लाख टन साखरसाठा शिल्लक होता. त्यामुळे तब्बल १६ लाख टन साखरसाठा शिल्लक राहिला होता. ऊस उत्पादकांचे देणे, ऊस तोडणी मजुरांचे देणे, कामगारांचे पगार यासाठी साखर कारखान्यांनी साखर बाजारात विक्रीसाठी काढून ७ लाख ९२ हजार टन साखरविक्री केली आहे. मे महिन्यांत कारखान्यांनी ६९ हजार टन साखरविक्री केली आहे. गेल्या महिन्यांत मागील दरापेक्षा चांगला दर कारखान्यांना मिळाला आहे. २ हजार ८०० ते ३ हजार २०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. साखर कारखान्यांनी टेंडर काढून साखरविक्री केली आहे. श्रीगोंदा कारखान्याने मागील महिन्यात ३ हजार ७०० टन साखरविक्री केली असून ३ हजार २०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. तर प्रवरा, संजीवनी, वृद्धेश्वर, अगस्ती या कारखान्यांनी तीन हजार रुपये क्विंटल साखरविक्री केली आहे. कारखान्यांनी दर महिन्याला साखरविक्री करूनही तब्बल आठ लाख १६ हजार टन साखरसाठा गोदामांत पडून आहे. त्यात अंबालिका कारखान्याचा तब्बल १ लाख टन, ‘मुळा’चा ८५ हजार टन, विखे सहकारी कारखान्याचा ६४ हजार टन साखरसाठा पडून आहे.
या पेक्षा थोडा जास्त दर मिळाल्यास हे कारखाने साखर विक्रीला काढतील, असा अंदाज आहे. पुढील हंगाम अवघ्या चार महिन्यानंतर आहे. या हंगामासाठी मुबलक ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याने येत्या चार महिन्यांत कारखान्यांना गोदामांत पडून असलेली साखर विक्रीस काढावी लागणार आहे.