हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
राज्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात १९५ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते. त्यातील जवळपास ५० साखर कारखान्यांमध्ये गाळप बंद करण्यात आले आहे. संबंधित कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस संपल्यामुळे हे कारखाने बंद करण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत ९६.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात १०७ लाख टन साखर तयार झाली होती.
महाराष्ट्रात यंदा १९५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. हंगामात ७ मार्च पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार एकून ८६७ लाख टन ऊस गाळप झाले. त्याद्वारे आतापर्यंत ९६.५० लाख टन साखर तयार झाली आहे व सरासरी उतारा ११.१२ टक्के आला आहे.
कोल्हापूर विभाग उताऱ्यामध्ये आणि गाळपामध्ये आघाडीवर असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक १९९ लाख टन ऊस गाळप झाला आहे. त्या विभागात १२.२६ टक्के साखर उतारा मिळाला असून, त्यातून २४४.६३ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. पाठोपाठ सोलापूर विभागात १९७.७९ लाख टन गाळप झाले आहे. त्या विभागात १०.१९ टक्के उतारा मिळाला असून २०१ ला क्विंटल उत्पादन झाले आहे. पुणे विभागात तिसऱ्या क्रमांकावर असून १८२ लाख टन गाळपातून ११.४४च्या रिकव्हरीने २०८ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
गेल्या आठवडाभरात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने कारखान्यातील गाळप थांबविण्यास सुरुवात झाली आहे. यात सोलापूर विभागातील १६ कारखाने बंद करण्यात आले आहेत तर, कोल्हापूर विभागातील १४ कारखाने ऊस संपल्यामुळे बंद झाले आहेत. गाळपासाठीचा ऊस संपत असल्याने शेवटच्या टप्प्यात कारखाने बंद होण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. यंदाचा हंगाम राज्यात एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp