थकबाकी न मिळाल्याने 5 हजार शेतकर्‍यांची निदर्शने

अंबाला: संपूर्ण देशात साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. यामुळे साखर कारखानेही समस्यांचा सामना करत आहेत. ऊस शेतकर्‍यांची थकबाकी भागवण्यासाठी कारखाने सक्षम नाहीत. हरियाणामध्ये ऊसाच्या थकबाकीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अंबाला येथील खासगी साखर कारखान्याला ऊस देणार्‍या ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ऊस थकबाकी न मिळाल्यामुळे निषेध तीव्र केला आहे. साखर कारखान्याच्या बाहेर त्यांनी 2018-2019 च्या हंगामातील थकबाकी लवकर देण्याची मागणी करत साखर निदर्शने केली.

शेतकरी इतके संतप्त झाले होती की, त्यांनी आपले कपडे उतरवून निषेध व्यक्त केला. यापूर्वी त्यांनी ऊसाच्या थकबाकीपोटी नारायणगडमध्ये महापंचायत घेवून, थकबाकी निकाली काढण्यासाठी कारखान्यांना 22 ऑगस्टची मुदत दिली तसेच तिव्र निदर्शने करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर कारखान्याला कर्ज मिळताच लवकरच शेतकर्‍यांचे रखडलेले पैसे त्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही ऊस उत्पादकांना देण्यात आली होती. पण, अंतिम मुदतीनंतरही थकबाकी न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी अजूनही पैशाच्या प्रतीक्षेत आहेत.

ऊस तोडणी नंतर कारखान्यांना 14 दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावी, असा नियम आहे. पण कारखाने तसे करण्यात अपयशी ठरले. जानेवारीपासूनची ऊस शेतकर्‍यांची बाकी कारखान्यांकडे देय आहे. ऊसाची कमतरता आणि साखरेचे उदासीन भाव यामुळे ऊस शेतकर्‍यांची एफआरपी थकीत असल्याचे सांगितले.
नारायणगड साखर कारखान्याकडे 2018-2019 या हंगामासाठीचे 5 हजारापेक्षा अधिक ऊस शेतकर्‍यांचे 86 करोड रुपये देय आहेत. तातडींने ही थकबाकी न मिळाल्यास निदर्शने अधिक तिव्र करण्यात येतील, असा इशाराही यावेळी शेतकर्‍यांनी दिला.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here