कोल्हापूर जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाच्या चौथ्या दिवशी साखर, सिमेंट, औद्योगिक कच्च्यामालाच्या उलाढालीची गती मंदावलेली दिसून येत आहे. याचा सर्वात मोठा फटका औद्योगिक मालाच्या वाहतुकीवर झालेला आहे. संप अजूनहि सुरु असून आज लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहीते यांची भेट घेतली.
साखर, सिमेंट, औद्योगिक कच्चा माल गोदामात पडून असल्याने व्यवहार करूनही व्यापाऱ्यांना माल पाठवता आलेला नाही. त्यामुळे चार दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 500 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
डिझेल पेट्रोलची दरवाढ रद्द करावी. या प्रमूख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रन्सपोर्ट कॉंग्रेसने देशव्यापी चक्का जाम आंदोलन २० जुलैपासून सुरू केले आहे. यामध्ये जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनही सहभागी झाल्याने कोल्हापूरातील सुमारे १० हजार टॅंम्पो आणि 16 हजार ट्रक जागेवरच थांबून आहेत.
आज चक्का जाम आंदोलनाचा चौथा दिवस असून जिल्ह्यातील माल वाहतूक बंद असल्याने सर्वच उद्योगांची उलाढाल मंदावली आहे. कोल्हापूरातून (कोल्हापूर, सांगली, कराड) रोज सुमारे पाचशे ट्रक साखर संपूर्ण देशात पाठवली जाते व निर्यातदेखील केली जाते. मात्र वाहतुकदारांचा संप अजूनही सुरु असल्याने 5 हजार टन साखर सध्या गोदामातच पडून आहे. यामुळे गेल्या चार दिवसांत या संपाचा बाजारापेठेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येत आहे.
वाहतूकदारांचा संप सुरू असून अद्याप संप मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.