कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या हस्ते दीपावली पाडव्यानिमित्त गूळ सौदे काढण्यात आले. यावेळी सागर येरुडकर यांच्या गुळाला ५,६०१ रु. दर मिळाला. सभापती प्रकाश देसाई म्हणाले, मुहूर्तासाठी १०० गाड्या गूळ आवक झाली आहे. आवक भरपूर असतानाही दर चांगला निघाला.
मुहूर्ताच्या सौद्यावेळी गुळाला किमान प्रतिक्विंटल ३,५०० ते कमाल ५,६०१ दर निघाला. या दरामुळे गूळ उत्पादक शेतकरी समाधानी राहतील असा विश्वास सभापती देसाई यांनी व्यक्त केला. संचालक संभाजी पाटील, भारत पाटील, शंकर पाटील, सुयोग वाडकर, पांडुरंग काशीद, राजाराम चव्हाण, दिलीप पोवार, सचिव जयवंत पाटील यांसह कर्मचारी, व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार उपस्थित होते.