बलरामपूर : बजाज हिंदूस्थान साखर कारखान्याच्या इटईमैदा युनीटमध्ये अचानक लागलेल्या आगीत ५७ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. कारखाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आगीतील नुकसानीची पाहणी करून मदत देण्याची मागणी केली आहे.
कारखान्याचे प्रशासन अधिकारी के. पी. सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, दुपारी एकच्या सुमारास कारखान्यातील साखर पॅकिंग युनीटमध्ये वरच्या बाजूला असलेल्या शुगर ग्रेटरमध्ये अचानक आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर तातडीने उतरौला पोलीस ठाणे आणि अग्निशमन विभागाला दूरध्वनीवरून या घटनेची माहिती देण्यात आली. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत शुगर ग्रेटर आणि पॅकिंगसाठी आणलेल्या ग्रेटरमधील साखर जळाली. सुमारे ४० लाख रुपये किंमतीचे शुगर ग्रेटर आणि १७ लाख रुपये किमतीची पाचशे क्विंटल साखर आगीत भस्मसात झाली असे या पत्रात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून मदत करावी अशी मागणी कारखाना प्रशासनाने केली आहे.