नांदेड : नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी १७ जानेवारीअखेर ६३ लाख ३४ हजार टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी ५८ लाख ४८ हजार ९१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर सहसंचालक सचिन रावल यांनी ही माहिती दिली. विभागाचा साखरेचा सरासरी उतारा ८.९८ टक्के असून यामध्ये नांदेड विभागात सर्वाधिक ११ साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.
विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये २९ साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. बुधवारअखेर या कारखान्यांनी ६३ लाख ३४ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर ५८ लाख ४८ हजार ९१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू झाले आहेत. हे सर्वच कारखाने खासगी आहे नांदेड जिल्ह्यात सहा कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यात पाच खासगी, तर एक सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी, तर तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.