मुजफ्फरनगर जिल्ह्यात ५९०.३६ लाख क्विंटल उसाचे गाळप

मुजफ्फरनगर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन साडेतीन महिने उलटले आहेत. चालू हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ५९०.३६ लाख क्विंटल उसाचे गाळप केले असून आतापर्यंत ६३.४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्यातील एसएपीनुसार साखर कारखान्यांनी विकत घेतलेल्या उसाची किंमत १८९६.२१ कोटी रुपये आहे. यापैकी ९७३.३७ कोटी रुपयांचे वितरण आतापर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना केले आहेत. एकूण उसाच्या किमतीच्या ५८.७९ टक्के पैसे मिळाले आहेत. कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या खरेदी दराप्रमाणेच उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये आठ साखर कारखाने गाळप करीत आहेत. त्यापैकी सात कारखाने खासगी तर मोरना हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. या सर्व साखर कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता ६१७००० क्विंटल आहे. सध्या त्यांच्याकडून ५.७१ लाख क्विंटलचे गाळप सुरू आहे. कारखान्यानी आतापर्यंत ५९०.३६ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ६३.४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गाळप झालेल्या उसाची एसएपीनुसार किंमत १८९६.२० कोटी रुपये इतकी आहे. यापैकी कारखान्यांनी ९७३.७३ कोटी रुपये दिले आहेत. ऊस अधिनियमानुसार, कारखान्यांना ऊस खरेदी केल्यानंतर चौदा दिवसांत पैसे देणे बंधनकारक आहे. या हिशोबाने अद्याप ६८२.४२ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करायचे आहेत.

पैसे देण्यात टिकौला कारखाना आघाडीवर, भैसाना पिछाडीवर
उसाचे पैसे देण्यात भैसाना साखर कारखाना सर्वात पिछाडीवर आहे. कारखान्याने या गळीतापैकी फक्त १५.४४ लाख रुपये दिले आहेत. हे एकूण थकबाकीच्या ०.०६ टक्के इतके आहे. टिकौला साखर कारखान्याने सर्वाधिक पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. कारखान्याने ८५ टक्के पैसे दिले आहेत. खतौली साखर कारखाना या क्रमवारीत दुसऱ्या तर मंसूरपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी अनुक्रमे ८३ आणि ७८ टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. सहकारी क्षेत्रातील मोरना साखर कारखान्याने ३५.६३ टक्के, रोहानाने ४६.३४ टक्के, तितावीने ४१.१३ टक्के, खाईखेडीने ६० टक्के पैसे दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ६९१ ऊस खरेदी केंद्रे आहेत. छोटे शेतकरी या खरेदी केंद्रांवर उसाची विक्री करणे योग्य समजतात. तर बडे शेतकरी थेट कारखान्याच्या प्रवेशद्वारावर उसाची विक्री करतात.

दरम्यान, उसाच्या वजनात होणारी फसवणूक रोखण्यासाठी वजनमापे निरीक्षण विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांसह वरिष्ठ ऊस विकास निरीक्षकांची पथके कार्यवाही करत आहेत. अचानक पाहणी केली जात आहे. यंदा १०-११ ऊस खरेदी केंद्रांवर असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात उसाच्या वजनात फसवणूक होऊ देणार नाही असे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here