‘गौरी शुगर’चे ६ लाख ३० हजार टन ऊस गाळप पूर्ण : बाबुराव बोत्रे पाटील

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर साखर कारखान्याने आत्तापर्यंत ६ लाख ३० हजार मेट्रिक टन इतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. ओंकार शुगर ग्रुपने ऊस दरात नेहमी शेतकऱ्यांना झुकते माप देत सर्वोच्च दर देण्याचा प्रयत्न केला आहे. गौरी शुगर साखर कारखान्याने शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील ऊस वेळेवर नेला असून, पेमेंटदेखील तातडीने जमा केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व मोठा विश्वास निर्माण केला आहे, अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली.

बोत्रे-पाटील म्हणाले, यंदाच्या वर्षी उशिरा कारखाने सुरू झाले. सुरुवातीला सर्वत्र ऊस तोडणीसाठी स्पर्धा होती. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस गौरी शुगर साखर कारखान्याने तोडल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पीक वेळेत घेता आले. या वर्षीचा गाळप हंगाम मार्चपर्यंत चालू राहणार आहे. मार्चपर्यंत शिरूर व श्रीगोंदा तालुक्यांतील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याची कारखाना प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात येईल. शेतकऱ्यांनी बिलाची काळजी करू नये. ओंकार ग्रुपने नेहमी शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च बाजारभाव देण्याचा प्रयत्न केला आहे, असा विश्वासही बोत्रे पाटील यांनी या वेळी दिला.

गौरी शुगर साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर आर. टी. यादव म्हणाले, कारखान्याला शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस दिला आहे. शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर देत असल्यामुळे कारखान्याला ऊस देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरुवातीपासून आहे. चालू वर्षी कारखाने उशिरा सुरू झाल्यामुळे याचा फटकादेखील गळीत हंगामावर बसत आहे. तरीही कारखान्याने चांगल्या रीतीने ऊस गाळप केले आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here