सोलापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांकडे ३९ कोटी रुपये ऊस बील थकीत

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांकडे गेल्या हंगामातील एफआरपीचे ३९.५३ कोटी रुपये अद्यापही थकीत आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. जिल्ह्यात उसाचे २,१०,९५७ हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होते. त्यातील काही ऊस शेजारच्या जिल्ह्यात गाळपास गेला. उर्वरित क्षेत्रातून जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये १,६८,४६,७५१ टन उसाचे गाळप झाले. त्यापोटी ४,६०० कोटी रुपये ऊस बिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, अद्याप ३९ कोटी ५३ लाख रुपये कारखान्यांकडे येणे-बाकी आहे.

थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटनेने सोलापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलने केली. पण कारखानदारांनी अद्याप दखल घेतलेली नाही. मागील हंगामात जिल्ह्यात ९.४६ टक्के सरासरी साखर उताऱ्याने एक कोटी ५९ लाख ३२ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले होते. १५ जुलैअखेर कारखान्यांकडे ४९.८५ कोटी रुपये थकीत होते. या सुधारणा होवून ३१ जुलैअखेर ३७.६९ कोटी रुपये एफआरपी थकीत राहिले. मात्र, १५ ऑगस्टअखेर संपलेल्या पंधरवड्यात केवळ दोन कोटी रुपये थकीत एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली आहे. दरम्यान, उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेली घट, ऊसतोडणी यंत्रणेचा अभाव आदी कारणांमुळे यंदाचा गाळप हंगाम जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here