पानीपत : डाहर येथील सहकारी साखर कारखान्याने दुसऱ्या गळीत हंगामासाठी ५४ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, यंदा ६१.५७ लाख क्विंटल गाळप झाले आहे. या वर्षी उसापासून साखरेचा उताराही प्रती क्विंटल १.५० किलोग्रॅम जादा मिळाला आहे. १५ एप्रिलपर्यंत गळीत हंगाम समाप्त होईल, अशी अपेक्षा कारखाना प्रशासनाला आहे. यादरम्यान आणखी जवळपास २.५० लाख क्विंटल उसाचे गाळप होईल. गोहाना रोडवरील हा साखर कारखाना दीड वर्षांपूर्वी डाहरमध्ये स्थलांतरित करण्यात आला होता.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप नैन यांनी सांगितले की, गोहाना रोडवरील या कारखान्याची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली होती. आता हा कारखाना नव्याने उभारला आहे. गेल्यावर्षी एक क्विंटल उसापासून ८.५० किलो साखर उत्पादन झाले होते. यंदा ते वाढून १० किलो झाले आहे. या हिशोबाने साखर उत्पादन १५.७८ टक्के वाढेल. पानीपतचे जवळपास ४,००० शेतकरी दरवर्षी जवळपास ६५ लाख क्विंटल उसाचे उत्पादन घेतात. जुन्या कारखान्यात ३० लाख क्विंटल उसाचे गाळप केले जात होते. वेळेत गळीत हंगाम समाप्त होत नसल्याने शेतकऱ्यांचे दोन महिने वाया जात होते.
त्यामुळे शेतकरी एप्रिल आणि मे महिन्यात ऊसाची लागवड न करता जून अथवा जुलैमध्ये करत होते. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी वेळेवर ऊस लागवड केली. त्यामुळे यंदा पिकाला पूर्ण ११ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यामुळे उसाचा रस वाढला आहे. पंधरा एप्रिलपर्यंत हंगाम समाप्त होईल. एप्रिल अखेरीस साखरेची निविदा जारी होईल. जवळपास ५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे असे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी स्पष्ट केले.