कोल्हापूर, ता. 28 : दिड महिन्यापासून जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे. आत्तापर्यंत 69 लाख 60 हजारहून अधिक उसाचे गाळप झाले आहे. तर, दरम्यान जिल्ह्यात साखर कारखान्यांचा सरासरी 11.61 उतारा आहे.
जिल्ह्यात 22 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. प्रतिदिन सुमारे 1 लाख 60 हजारहून अधिक मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. मात्र, आतापर्यंत गाळप झालेल्या उसाचे सुमारे 208 कोटींहून अधिक रूपयांची एफआरपी थकवलेली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक ऊस गाळपामध्ये दत्त दालमिया, दत्त शिरोळ तसेच बिद्री कारखाना आघाडीवर आहे. तर, सर्वाधिक साखर उताराही दत्त दालमिया कारखान्याचा आहे. दालमिया कारखान्याचा सरासरी 13.30, बिद्री 13.5, मंडलिक कारखाना 13.31 उतारा मिळत आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ऊस तोड करणारे मजूर कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक कारखान्यांनी ऊस तोड मशिनचा वापर करून ऊस तोडी सुरू केल्या आहेत. मात्र, पाळीपत्रकानूसार किंवा चौदा महिने झाले तरीही उसाला तोड मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कारखाना पातळीवर या गोष्टीकडे लक्ष दिले जात नसल्याने सर्वच कारखान्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जात आहे. सर्वच कारखान्यांची एफआरपी थकल्याने सारख कारखानदार दोन टप्प्यात एफआरपी देण्याच्या तयारीत आहेत. साखर आयुक्तांकडेही याची मागणी करत आहेत. राज्य शासन किंवा संघटना याला विरोध करत आहेत. कारखानदार मात्र आपआपल्या ताकदीने दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारखानदारांनी आत्तापर्यंत 208 कोटीहून अधिक रक्कम थकवली असतानाही शेतकऱ्यांचे पैसे देण्याबाबत उदासिनता दाखवत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.