नवी दिल्ली : भारतात पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी २०२०-२०२१ या हंगामातील पहिल्या चार महिन्यांत हे यश मिळाले आहे. सरकारच्या २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दीष्टाच्या दिशेने हे यशस्वी पाऊल मानले जात आहे.
प्रसार माध्यमांतील माहितीनुसार, जर तेल वितरण कंपन्यांनी (ओएमसी) जर उपलब्ध इथेनॉलचा साठा खरेदी केला, तर आगामी काही महिन्यात इथेनॉलचे मिश्रण नोव्हेंबरच्या हंगाम समाप्तीपर्यंत ८ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते असे या उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांसह दमण आणि दीव या केंद्रशासीत प्रदेशामध्ये ९.५ ते १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रीत केले जात आहे. त्यामुळे ही राज्ये २०२२ च्या आपल्या उद्दीष्टाच्या अगदी जवळ पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.