कोल्हापूर : गेल्या हंगामात पुरवठा केलेल्या उसाचा दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. कोल्हापूर विभागातील ३२ पैकी केवळ सात साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता देण्याची तयारी दर्शवली. उर्वरीत साखर कारखान्यांपैकी अनेकांनी प्रस्तावही सादर केलेले नाहीत. गत हंगामातील उसाला प्रती टन ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
२३ नोव्हेंबर २०२३ रोजी कोल्हापूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी रेखावार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. ज्या साखर कारखान्यांनी आधीच्या हंगामात पुरवठा केलेल्या उसाला उताऱ्यानुसार एफआरपी ३००० हजार रुपये व त्यापेक्षा जादा दर दिला असेल तर त्यांनी दुसरा हप्ता म्हणून प्रतिटनास ५० रुपये आणि १०० रुपये देण्याचे ठरले होते. कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अतिरिक्त जादा रक्कम देण्यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ पाठविण्याचे आवाहन केले होते. प्रस्ताव पाठविल्यानंतर दोन महिन्यात त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री मुश्रीफ, जिल्हाधिकारी रेखावार यांना दिले होते. मात्र गत हंगामातील दुसरा हप्ता देण्यासाठी दत्त साखर कारखाना (शिरोळ), शरद (नरंदे), शाहू (कागल), अथर्व दौलत (हलकर्णी, चंदगड), जवाहर (हुपरी), मंडलिक (हमीदवाडा) व पंचगंगा (इचलकरंजी) या सात साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता देण्याची तयारी दर्शवली आहे. तसे प्रस्तावही पाठविले आहेत. इतर कारखान्यांनी मात्र, याकडे दुर्लक्ष केले आहे.