पुणे : यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८ लाख टन उसाची उपलब्ध होती. सुरुवातीच्या काळात आम्ही साधारणपणे १० लाख टनापर्यंत ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले होते. मात्र मागील वर्षीचा अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईचाही काहीसा परिणाम एकरी ऊस उत्पादनावर झाला. त्यामुळे भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ११४ दिवसांच्या गळीत हंगामात ७ लाख २९ हजार ५८१ टन उसाचे गाळप केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली. यावर्षी कारखान्याने सरासरी १०.७० टक्के साखर उतारा मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष काटे म्हणाले की, बँकेने साखरेचे मूल्यांकन मालतारणाच्या दृष्टीने शंभर रुपयांनी प्रतिक्विंटल कमी केल्याने सभासदांना उसाचे पेमेंट वेळेत करण्यासाठी कारखान्याच्या सचालक मंडळाला खूप कसरत करावी लागली, मात्र छत्रपती कारखान्याने ऊस उत्पादक सदस्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय जाहीर केला होता आणि त्याची अंमलबजावणीदेखील केली. सर्व सभासद, कारखाना कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या एकजुटीने आणि व्यवस्थापनामुळे हंगाम सुरळीत पार पडल्याचे त्यांनी सांगितले.