हरियाणा: हरियाणातील धान्य बाजारातून गहू उचलण्यास होत असलेल्या विलंबाने व्यापारी आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊस आणि मंडईंमध्ये जागेअभावी गव्हाची आवकही मंदावली आहे. एका अहवालानुसार, खरेदी केलेल्या गव्हातील केवळ ३० टक्केच बाजारातून उचल झाली आहे. उर्वरित ७०टक्के गहू अजूनही राज्यातील बाजारात तसाच पडून आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, सर्व धान्य बाजार आणि खरेदी केंद्रांमध्ये ३८ लाख मेट्रिक टन गव्हाची आवक झाली आहे, त्यापैकी ३६.५२ लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला आहे. मात्र यातून सोमवारपर्यंत केवळ १०.२२ लाख मेट्रिक टनाचीच उचल झाली आहे.
पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्यात गव्हाची उचल करण्यात कर्नाल अव्वल स्थानी आहे. या जिल्ह्यांत ६ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली होती, त्यापैकी २.६० लाख मेट्रिक टन गव्हाची उचल करण्यात आली आहे. तर कॅथल जिल्ह्यात ४.५ लाख मेट्रिक टनांपैकी १.६ लाख मेट्रिक टन गव्हाची उचल करण्यात आली आहे. दुसरीकडे, यमुनानगरमध्ये खरेदी करण्यात आलेल्या १.५४ लाख मेट्रिक टन गव्हापैकी ८० हजार मेट्रिक टन गव्हाची उचल करण्यात आली आहे. कर्नालचे उपायुक्त अनिश यादव म्हणाले की त्यांनी प्रत्येक खरेदी केंद्र आणि धान्य बाजारात एक नोडल अधिकारी नियुक्त केला आहे. वेळेवर उचल व्हावी यासाठी सर्व अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. जेणेकरून लिफ्टिंग सुरळीतपणे करता येईल. खरेदी केलेला गहू रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी वॅगनची उपलब्धता कमी असल्याने काही धान्य बझारामधून गहू उचल करण्यात अडचण येत आहे. कारण अधिकार्यांना थेट एफसीआयला डिलिव्हरी द्यावी लागते.