शामली: जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या थकीत ऊस बिलांचा आढावा घेत जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळाले पाहीजेत असा इशारा त्यांनी साखर कारखानदारांना दिला.
जिल्हाधिकारी सभागृहात जिल्हाधिकारी जसजित कौर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांच्या ऊस बिलांबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थकबाकीचा आढावा घेतला. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी २०२०-२१ या गळीत हंगामातील स्थितीची माहिती दिली. शामली कारखान्याकडे ३४५.९१ कोटीपैकी १००.९९ कोटी रुपये दिले आहेत. ऊन कारखान्याने ३३७.१० कोटींपैकी १२४.९९ कोटी तर थानाभवन कारखान्याने ४३९.३० कोटींपैकी ८२.७४ कोटी रुपये दिले असल्याचे सांगत त्यांनी एकूण ८११ कोटींची थकबाकी असल्याचे सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उर्वरीत पैसे देण्याबाबत प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले. यावेळी शामला कारखान्याला २०१९-२० मध्ये एक्स्पोर्ट केलेल्या साखरेला मिळणारे ३३५६.०० लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांची थकबाकी देण्यास वापरण्याचे निर्देश देण्यात आले. सहकारी ऊस विकास समितीच्या प्रभारी सचिवांना शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीला शामली साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक कुलदीप पिलानीया, थानाभवन कारखान्याचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक जे. बी. तोमर, सुभाष बहुगुणा, ऊन साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक अनिल कुमार अहलावत आदी उपस्थित होते.
दरम्यान, शामली कारखान्याला केंद्राकडून ३३ कोटी ५६ लाख रुपये साखर निर्यात अनुदान सरकारकडून मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून हे अनुदान प्रलंबीत होते.