पुणे : पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथील प्रगतशील शेतकरी आकाश हनुमंतराव चाचर व कुलदीप हनुमंतराव चाचर यांनी चालू गळीत हंगामात एकरी ८५ ते ९० टन उत्पादन मिळवले आहे. जमिनीची योग्य मशागत, शेणखताचा वापर, आवश्यक खते आणि औषधांच्या फवारण्या, पाण्याची उपलब्धता तसेच योग्य नियोजन आणि देखभालीमुळे उसाची उत्पादकता वाढल्याचे शेतकरी आकाश व कुलदीप चाचर यांनी सांगितले.
चाचर यांनी सांगितले की, त्यांनी को-८६०३२ या उसाचे चालू गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेतले. उसाची उंची साधारण १६ ते १७ फूट आहे व उसातील कांड्यांची संख्या ३२ ते ३४ आहे. ऊस उत्पादनासाठी जयश्री चाचर आणि श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर्यन यादव, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, ॲग्रीहोश्चर उज्ज्वल पवार, चीटबॉय आनंदा पाटोळे, संदीप मोटे, कृषी सहायक स्नेहल जाधव यांनी मार्गदर्शन केल्याचे शेतकरी आकाश चाचर यांनी सांगितले.