कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी चुरशीने ८९.०३ टक्के मतदान झाले. कारखान्याच्या निवडणुकीसाठी चार तालुक्यांतील १७३ केंद्रांवर ५६ हजार ९१ पैकी ४९ हजार ९४० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ महालक्ष्मी विकास आघाडी व खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे, ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यांच्यात जोरदार लढत झाली आहे.
निवडणुकीदरम्यान, मुरगूड येथे बोगस मतदानाची शंका आल्याने ‘गोकुळ’चे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनी रोखले व गोंधळ उडाला. कारखान्याचे कार्यक्षेत्र करवीर, राधानगरी, भुदरगड आणि कागल या तालुक्यांतील २१८ गावे असे आहे. कारखान्याच्या २५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदान केंद्रात प्रत्येक चार बूथ असल्याने मतदान प्रक्रिया गतीने झाली. दरम्यान, उद्या, मंगळवारी मुस्कान लॉन येथे सकाळी आठपासून मतमोजणी होणार आहे. कारखान्याच्या मागील निवडणुकीत ८२ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. त्याचा फायदा कोणाला होणार हे मतमोजणीवेळी समजेल.