कोल्हापूर : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. हंगाम समाप्तीनिमित्त सभासद आप्पासो पाटील व त्यांच्या पत्नी संचालिका रंजना पाटील यांच्या हस्ते सांगता पूजा पार पडली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते. कारखान्याने यावर्षी १३२ दिवसांत उच्चांकी ९ लाख ५४ हजार ७७६ टन उसाचे गाळप करून ११ लाख ९८ हजार ७०० साखर पोती उत्पादन केले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. कारखान्याने १५ मार्च अखेरची ऊस बिले सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहेत.
कारखान्याचा सहवीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून तो मे अखेरपर्यंत चालणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. गेल्या १५४ दिवसांमध्ये प्रकल्पातून ८ कोटी ८० लाख ९४ हजार १०० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यापैकी कारखाना वापर वगळता ५ कोटी ७५ लाख ७२ हजार १०० युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे. ६० केएलपीडी’ क्षमतेच्या डिस्टिलरी व इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आठवडाभरात इथेनॉल निर्मिती सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत केले. संचालक राजेंद्र पाटील, राहुल देसाई, पंडितराव केणे, रंगराव पाटील, डी. एस. पाटील, फत्तेसिंह भोसले, दीपक किल्लेदार, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार आदी उपस्थित होते.