महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी गाळप परवान्याशिवाय हंगाम सुरू केला आहे. मात्र, त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, महाराष्ट्रातील ९ साखर कारखान्यांवर राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयाने आवश्यक गाळप परवान्याशिवाय हंगाम सुरू केल्याप्रकरणी दंडाची कारवाई केली आहे.
साखर आयुक्त कार्यालय साखर कारखान्यांना परवाना जारी करते. त्याशिवाय आपले कामकाज सुरू करण्याची त्यांना अनुमती नाही. परवाना जारी करताना साखर आयुक्त कार्यालयाकडून उसाची उपलब्धता, गेल्या हंगामातील थकबाकी आणि कारखान्याकडून सरकारी थकबाकी अथवा विविरण सादर केले आहे का याची तपासणी केली जाते. जर एखाद्या कारखान्याने थकबाकी दिली नसेल तर साखर आयुक्त त्यांना पुढील हंगामात गाळप परवाना देण्यास नकार देतात. गाळप परवाना घेतल्याशिवाय कारखाना सुरू केल्यास प्रती टन ५०० रुपयांच्या दंडाची तरतुद आहे.
Indianexpress.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ज्या नऊ साखर कारखान्यांना दंड ठोठावण्यात आला आहे, त्यामध्ये ४ पुण्यातील, प्रत्येकी २ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील तर एक साताऱ्यातील आहे. सात कारखाने सहकारी असून दोन खासगी कारखान्यांचा यात समावेश आहे. दंडाची एकूण रक्कम ३८.१३ कोटी रुपये आहे.