सांगली : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात ८७ लाख ४२ हजार ६ टन उसाचे गाळप झाले असून ९८ लाख २९ हजार ४६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सर्व १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. हंगामात माणगंगा आणि महांकाली हे दोन कारखाने बंद होते. जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा ११.२४ टक्के राहिला. जिल्ह्यात राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटचा सरासरी उतारा १२.५१ टक्के असून तो उच्चांकी आहे. तर तासगाव कारखान्याचा सरासरी उतारा सर्वात कमी म्हणजे ८.५६ टक्के आहे.
यंदाच्या हंगामात १७ कारखान्यांचा सरासरी उतारा हा ११.२४ टक्के राहिला. राजारामबापू कारखान्याच्या वाटेगाव युनिटचा सरासरी उतारा १२.६२ टक्के असून तो जिल्ह्यात उच्चांकी ठरला. कारखानदारांच्या पदरात साखरेतून ३८३३ कोटी ३२७९ लाख ४०० रुपयांचा महसूल पडला. याशिवाय उप पदार्थातून चांगला नफा मिळाला. दरम्यान, २०२३-२४ साठीच्या हंगामात जिल्ह्यात एक लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस होता. तर २२-२३ च्या हंगामात एक लाख २४ हजार ५८९ हेक्टरमधील ऊस उपलब्ध होता. मात्र यावेळी नवीन लावणीचे प्रमाण जेमतेम आहे. यामुळे आगामी हंगामात उसासाठी कारखानदारांत स्पर्धा, पळवापळवी होणार आहे. याचबरोबर अद्याप अनेक कारखान्यांनी देय असलेली बिलाची संपूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.