नवी दिल्ली : चीनी मंडी
भारतातील साखर उद्योग दुहेरी कचाट्यात सापडला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असलेला साखरेचा दर आणि वाढत जाणारा साखरेचा साठा यामुळे साखर उद्योगापुढे मोठे प्रश्नचिन्ह आहे. सध्याची स्थिती साखर उद्योगाला गोंधळात टाकणारी आहे. या उद्योगाला मोठा दिलासा मिळेल, अशी घोषणा सरकार कधी करणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
कारखान्यांकडून साखरेचा अनावश्यक पुरवठा आणि त्याचवेळी साखरेचे मोठे ग्राहक, साठेबाज यांच्याकडून साखरेची मागणीच थांबल्यामुळे साखरेचे दर वेगाने घसरले आहेत, अशी माहिती एका व्यापाऱ्याने दिली. या संदर्भात एका व्यापारी संघटनेने सांगितले की, सध्याच्या घडीला केंद्र सरकार कोणती घोषणा करते, हे महत्त्वाचे ठरते. त्यानंतरच देशातील साखर उद्योग कोणत्या दिशेने जाईल, यावर भाष्य करता येईल. देशात सध्या कोणत्याही परिस्थितीत साखरेचे भाव वाढण्याची शक्यता दिसत नाही. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर कमीच आहेत. जर, सरकारने २०१९च्या हंगामापूर्वी साखर निर्यातीचा अतिरिक्त कोटा निश्चित केला नाही, तर साखर कारखान्यांना साखर साठवून ठेवण्यातही अडचणी येणार आहेत.
साखरेला मागणीच नसल्यामुळे गेल्या बुधवारपासून राजधानी दिल्लीत साखरेचा दर क्विंटलमागे ८० ते १०० रुपयांनी घसरला आहे. साखर उद्योगासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.