नवी दिल्ली : चीनी मंडी
भारत आणि ऑस्ट्रेलियातील व्यपारसंबंध साखरेमुळे ‘कडू’ होण्याची शक्यता आहे. भारताने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना देऊ केलेले अनुदान मागे घेतले नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात भारताविरुद्ध ‘अॅक्शन’ घेऊ अशी धमकी ऑस्ट्रेलियाने दिली आहे. भारताच्या अनुदान धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अतिरिक्त साखर उपलब्ध होत असून, दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत, अशी ऑस्ट्रेलियाची तक्रार आहे.
या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री सायमन बर्मिंगहम यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्तालयाकडे आणि भारताच्या व्यापार उद्योग मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबतचे वृत्त ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे.
यात बिर्मिंगहम म्हणाले, ‘आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्याचे उल्लंघन करणारे नाही, हे इतर देशांना सांगण्यात आम्ही मागे पुढे पाहणार नाही. मुळात भारत आणि पाकिस्तानात ज्या पद्धतीने ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांना अनुदान दिले जाते आहे. त्याचा परिणाम साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होताना दिसत आहे. साखरेच्या बाजारात निर्माण झालेले हे अस्थैर्य संपवले पाहिजे.’
गेल्या दोन वर्षांत जगाच्या बाजारात साखरेचे दर गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळीवर आले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये दोन अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरची निर्यात असलेल्या साखर उद्योगाला खूप मोठा फटका बसला आहे. तेथील अनेक ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.