कोल्हापूर : चीनी मंडी
एकेकाळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे दोन शिलेदार असलेल्या खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यंदा ऊस दराच्या विषयावरून आमने-सामने आले आहेत. यंदाच्या गळीत हंगामाचा ऊस दर २७ ऑक्टोबरला नाही, तर २४ ऑक्टोबरला ठरेल, असा इशारा कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला.
शासकीय विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद झाली. येत्या २७ ऑक्टोबरला खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होणार आहे. तत्पूर्वी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नवीन रयत संघटनेची ऊस परिषद २४ ऑक्टोबरला वारणा कोडोली (ता. पन्हाळा) येथे होणार आहे. रयत संघटनेची ही दुसरी परिषद असून, त्यात यावर्षीच्या उसाला किती दर मिळावा, हे ठरले जाणार असल्याचे ही खोत यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री खोत आणि खासदार शेट्टी यांच्यातील वादामुळे यंदा दोन ऊस परिषदांमध्ये दोन स्वतंत्र ऊस दरांची मागणी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांमधील संघर्ष पहायला मिळणार आहे.
निवडणुकांमुळे आंदोलन होणार!
निवडणुकांच्या तोंडावर यंदा ऊस दर आंदोलन पेटणार, असा टोला राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना नाव न घेता लगावला आहे. गेले दोन-तीन वर्षे ऊस दर आंदोलनाची फारशी चर्चा नव्हती. पण, लोकसभा निवडणुकांमुळे आंदोलनाचे शस्त्र उपसले जाणार असल्याचे मंत्री खोत यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन पेटणार आणि कारखान्यांकडूनही त्यांना साथ मिळणार, अशी टिका खोत यांनी कोणाचे नाव न घेता केली.