मुंबई : चीनी मंडी
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ८६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. एका बाजुला डॉलर मजबूत होत आहे आणि रुपयाची निचांकी घसरण सुरूच आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारातील घसरणीवरही दिसून येत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या करात कपातीची घोषणा केल्यामुळे पेट्रोल-डिझेल किंचित स्वस्त होत असले, तरी तेलाच्या किंमत वाढीचा परिणाम आर्थिक घसरणीवर दिसून येत आहे.
कच्च्या तेलाच्या दराने उचल घेतली आहे. या परिणाम अर्थातच सगळीकडे दिसून येत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिल महिन्यापासून भारतीय बाजारातून ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून घेतलीय. विशेष म्हणजे अमेरिकेतील कोषागाराचे उत्पन्न गेल्या सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. भारतीय उत्पन्नात ५ टक्क्यांनी वाढ होऊन ते ८.६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या सात वर्षांत अमेरिकेतील कोषागारांचे उत्पन्न इतक्या वेगाने पहिल्यांदाच वर गेले आहे.
रिझर्व्ह बँकेने तेल कंपन्यांसाठी विदेशी चलन खरेदीचे नियम शिथील केल्यानंतरही रुपयाची घसरण सुरूच आहे. गुरुवारी शेअर निर्देशांकात ८०६.४७ अंशांनी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.