राशिवडे बुद्रुक: साखर कारखान्यांकडून ऊस लागण हंगामाच्या कराराला जोडून तीन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी संमतीपत्र घेतले जात आहे. या कराराला परिते येथील शेतकरी गट कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. यावेळी बाचाबाचीसह मोठा दंगा कार्यकर्त्यांनी केला.
साखर सहसंचालकांनी कडक निर्देश देवूनही सभासदांकडून संमतीपत्र घेतल्याचा संताप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना अनावर झाला आणि त्यांनी तब्बल चारशे करार फाडले. याबाबत शेतकरी संघटनेने, प्रशासनाकडून न्यायालयाचा अवमान होत आहे, एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे, अशा सूचना केल्या होत्या. तरीही असे प्रकार जिल्ह्यात सुरुच होते. शिवाय सभासदांच्या परवानगीशिवाय संमतीपत्र घेऊ नयेत, अशाही सूचना साखर सहसंचालकांनी केल्या होत्या. पण तरीही साखर कारखान्यांकडून करार केले जात असल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार स्वाभिमानीच्या कार्यक़र्त्यांनी कारार फाडून हाणून पाडला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, साताप्पा पाटील, रंगराव पाटील, मानाजी पाटील, एकनाथ पाटील, तुकाराम सुतार, मधुकर पाटील, चंद्रकांत नेमाने, रावसाहेब डोंगळे आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.