मुंबई : चीनी मंडी
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण मोहिमेला साखर कारखान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. साखर उद्योगातील अग्रणी कंपनी असलेल्या श्री रेणुका शुगर्स या कंपनीने येत्या दीडवर्षांत इथेनॉल निर्मिती क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दीड वर्षांत रेणुका शुगर्स २४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करणार आहे.
या संदर्भात रेणुका शुगर्सचे चेअरमन अतुल चुतर्वेदी यांनी सांगितले की, सध्या कंपनीत वर्षाला १२ कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे. येत्या १८ महिन्यांत आम्ही ही क्षमता २३ ते २४ कोटी लिटर पर्यंत नेणार आहोत. त्यासाठीची तयारी सुरू झालेलीच आहे आणि २०२०चे आर्थिक वर्ष संपेपर्यंत यात ३५० ते ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या घडामोडीत विल्मर शुगर होल्डिंग्ज कंपनीने रेणुका शुगर्स ही कंपनी संस्थापक नरेंद्र मुरकुंबी यांच्याकडून खरेदी केली आहे.
कंपनीची सह कंपनी असणारी केबीके केमिकल इंजिनिअरिंग ही कंपनी इथेनॉल तयार करणारी यंत्रणा पुरवणारी आहे. या कंपनीकडून रेणुका शुगर्सला मदत होणार आहे.
चतुर्वेदी म्हणाले, ‘सध्या देशात इथेनॉल मिश्रणाचा दर तीन ते साडेतीन टक्के आहे. पुढील वर्षी तो दोन टक्क्यांनी वाढणार आहे. त्याचबरोबर येत्या काही वर्षांत १० टक्के इथेनॉल मिश्रण टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणखी पावले उचलली जाणार आहेत. देशातील अनेक कारखाने आता इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवू लागले आहेत.’
सरकारचा पाठिंबा
सरकारची सहा हजार कोटी रुपयांची व्याज अनुदान योजना साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या सगळ्या उपाययोजनांमुळे २०३०पर्यंत इथेनॉल मिश्रण क्षमता २० टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याने इथेनॉलवाढीसाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेला मोठी संधी असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले.
कंपनीच्या कंडला प्रकल्पात महिन्याला एक लाख टन गाळप होण्याची क्षमता आहे. त्यामुळे जर स्थानिक बाजारात साखरेला चांगला दर मिळाला, तर कंडला प्रकल्प साखर उपलब्ध करून देऊ शकतो. कच्च्या साखरेची गरज इतर स्थानिक कारखाने भागवू शकत नाहीत. त्यामुळे कंडला प्रकल्प ही कमतरता भरून काढू शकते. याबाबत चतुर्वेदी म्हणाले, ‘साखर किती उपलब्ध करता येऊ शकते, हे आताच सांगता येत नाही. पण, जेवढी शक्य आहे तेवढी साखर उपलब्ध करता येईल.’
रेणुका शुगर्सला त्यांच्या मधूर या प्रक्रिया केलेल्या साखरेचे मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग करायचे आहे. पश्चिम भारतातील हा ब्रँड त्यांना संपूर्ण भारतात लोकप्रिय करायचा आहे