साखर कारखान्यांचा आत्मविश्वास दुणावला : अबिनाश वर्मा

नवी दिल्ली : चीनी मंडी

गेल्या पंधरा दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरांमध्ये झालेली सुधारणा यामुळे भारतातील साखर कारखान्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट दिले आहे. त्यातील बरीचशी साखर आपण निर्यात करू शकतो असा विश्वास कारखान्यांना वाटत असल्याचे मत इंडियन शुगर मिल असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष अबिनाश वर्मा यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलने गेल्या दोन वर्षांत ३५० ते ३६० लाख टन साखर उत्पादन केले होते. जगातील वाढते इंधन दर लक्षात घेऊन ब्राझीलने साखर उत्पादन कमी करून आता इथेनॉल उत्पादनाकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे, अशी माहिती वर्मा यांनी दिली.

ते म्हणाले, ‘भारताचा ऑक्टोबर महिन्याचा ओपनिंग स्टॉक १० ते १५ लाख टन असण्याची शक्यता आहे. तर हंगामाच्या अखेरपर्यंत देशात सुमारे ३५० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता यापूर्वी इंडियन शुगर मिल असोसिएशने व्यक्त केली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. तसेच उत्तर प्रदेशातही असमतोल पाऊस झाला आहे. तसेच महाराष्ट्रात काही ठिकाणी उसावर पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत इस्माला साखर उत्पादनाचा अपेक्षित आकडा दुरुस्त करावा लागले. कदाचित भारतातील साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. ते किती कमी होईल, याचा अंदाज आताच लावता येणार नाही. ’ सरकारने मदत दिल्यामुळे साखर कारखान्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही, असे मतही वर्मा यांनी व्यक्त केले.

ब्राझीलमध्ये यशस्वी झालेले इथेनॉल मॉडेल भारताने स्वीकारायला हवे असे सांगून वर्मा म्हणाले, ‘अतिरिक्त साखर उत्पादन रोखण्यासाठी भारताला इथेनॉल निर्मितीकडे वळावेच लागेल. भारतात गेल्या हंगामात ३२० ते ३३० लाख टन साखर उत्पादन झाले आहे आणि देशातील ऊस उत्पादनात कोणतिही घसरण पहायला मिळालेली नाही. त्यामुळे आपल्याला ब्राझीलचे मॉडेल स्वीकारावेच लागेल. त्यामुळे साखर उद्यागोला आणि शेतकऱ्यांनाच नव्हे तर, देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल. कारण, आपले कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होणार आहे.’

ब्राझील गेली अनेक वर्षे हेच धोरण राबवत आहे. केवळ यासाठी देशातील कारखान्यांनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे. अर्थात कारखाने यासाठी पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे, असे मतही वर्मा यांनी व्यक्त केले.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here