कोल्हापूर, ता 17: कोल्हापुरातील कृषी विभागाशी संबंधित कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी जिल्ह्यात कृषी भवन बांधण्यास आज मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव डवले, बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे, कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय सहसंचालक दशरथ कांबळे, जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाखुरे, सा. बां.चे कार्यकारी अभियंता सोनवणे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार आणि कोल्हापूर कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागाची सर्व कार्यालये शहराच्या विविध ठिकाणी असल्यामुळे कार्यालयीन कामामध्ये समन्वय वाढून, विविध योजनांचे संनियंत्रण व मुल्यमापन अधिक कार्यक्षम व्हावे, यासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने मंत्री महोदयांसमोर सादर केला होता. त्यानुसार, चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आज झालेल्या बैठकीत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यासंदर्भातील 15 दिवसात आदेश जारी करण्याच्या सूचना कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, कृषी भवन बांधण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही माननीय मंत्रीमहोदयांनी बांधकाम विभागाला दिल्या.
कोल्हापूर शहरामध्ये सध्यस्थितीत कृषी विभागीची एकूण नऊ कार्यालये असून, सहा कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी भाडेतत्वावर खासगी इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत. त्याशिवाय, कोल्हापूर शहरातच किटकनाशक पृथ्थकरण प्रयोगशाळा सुरु करण्याचे कृषी विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे शहरात एकूण 10 कार्यालये होणार असून, ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने तयार केला होता. त्यानुसार, या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी दिल्याने जिल्ह्यातील सर्व कार्यालये एकाच छताखाली येतील.
या नव्या प्रस्तावित प्रशासकीय कृषी भवनामध्ये विभागीय कृषी संहसंचालक, जिल्हा अधिक्षक, प्रकल्प संचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदाचाचणी प्रयोगशाळा, रासायनिक खते पृथ्थकरण प्रयोगशाळा, किटकनाशके पृथ्थकरण प्रयोगशाळा, भांडारगृह, अभ्यागत, अभिलेखकक्ष आदी कार्यालये एकाच छताखाली येतील. तसेच, शेतकरी प्रशिक्षण हॉल, शेतकरी वसतीगृह, ग्रंथालय, थेट शेतीमाल विक्री केंद्र आदी सुविधाही या कृषी भवनामध्ये उपलब्ध असणार आहेत.