कोल्हापूर, दि. 20 : केंद्र शासनाच्या असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ अंतर्गत विशिष्ट योजनांचा लाभ देण्याकरिता महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता “लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना” आज शासनाने जाहीर केली. याचा राज्यातील लाखो ऊस तोड कामगारांना फायदा होणार आहे.
या योजनेंतर्गत प्राथमिक टप्यात विविध प्रशासकीय विभागांच्या अंतर्गत सुरु असलेल्या घरबांधणी, वृद्धाश्रम व शैक्षणिक योजनांकरिता संबंधित प्रशासकीय विभागांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता निधी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. यामधील घरबांधणी योजनेमध्ये इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई नागरी, ग्रामीण आवास योजनांचा प्रथम टप्यात समावेश करण्यात आला आहे. शैक्षणिक योजनेमध्ये विमुक्तजाती व भटक्या जातीकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या वृद्धाश्रम योजनेच्या निकषाप्रमाणे देखील लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.