पुणे : चीनी मंडी
पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांच्या संपाचा परिणाम साखरेच्या रिकव्हरीवर होणार आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच कारखान्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने उसाचे गाळप ठप्प झाले आहे. मुळात ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये तोडणी झालेल्या उसाला चांगली रिकव्हरी मिळते. त्याच काळात कारखाने बंद असल्यामुळे प्रति टन रिकव्हरी कमी होणार आहे.
एफआरपीपेक्षा जादा रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे शक्य नसल्यामुळे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाविरोधात कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी ठोस भूमिका घेतली. सरकार हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत कारखाने सुरू न करण्याचा निर्णय कोल्हापुरातील साखर कारखान्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कारखान्यांकडूनही प्रतिसाद मिळाला. त्यामुळे साखर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सध्या ऊस गाळप बंद आहे.
साखर कारखान्यांना ऊस दराबाबत स्पष्टता हवी आहे. स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी रिकव्हरीचा बेस १० टक्क्यांवरून ९.५० टक्के करा, अशी मागणी केली आहे. तर रयतच्या संघटनेच्या परिषदेत १० टक्क्यालाच २ हजार ९५० रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, केंद्रीय कृषी मुल्य आयोगाने उसाच्या १० टक्के रिकव्हरीला २ हजार ७५० रुपये आणि त्यापुढे प्रत्येक टक्क्याला २८० रुपये असा दर निश्चित केला आहे.
दरम्यान, साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील १९४ साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागणी केली होती. त्यातील ५५ कारखान्यांना परवाना देण्यात आला असून, त्यातील ३२ कारखान्यांनी गाळपही सुरू केले आहे. राज्यातील २९ कारखान्यांनी हंगामातील एफआरपीचे पैसे भागवलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या परवान्याचा विषय राखून ठेवण्यात आला आहे. कारखान्यांनी संपाचा निर्णय घेतला असला तरी येत्या २० नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरू होतील, अशी अपेक्षा साखय आयुक्तालयाला आहे.
दिवाळीनंतर ऊस तोडणी वाहतूक करणारे मजूर कारखान्यांच्या परिसरात स्थलांतर करायला लागतील. दराविषयाचा तिढा दिवाळीनंतर चर्चेतून सुटेल, अशी अशा साखर उद्योगातील तज्ज्ञांना आहे.
गाळप हंगाम लांबण्याचा रिकव्हरीवर थोडाफार परिणाम होईल, पण त्याही पेक्षा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. कारण, जोपर्यंत ऊस तोड नाही तोपर्यंत शेतकऱ्याला उसाला पाणी देत राहवे लागणार आहे. पावसाने ओढ दिल्याने त्याच्यासाठी हे खूप मोठे संकट असणार आहे.