धामपूर: येथील साखर कारखान्यात तीन मजली इमारतीवरून पत्र्याचे शेड काढताना दोन कामगार खाली कोसळले. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. मृत कामगाराच्या कुटूंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी करत गोंधळ घातला. पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये यातून वादावादीही झाली. या प्रकारामुळे साखर कारखान्यात वजन काट्यावरील तोलाईचे कामही बंद पडले.
धामपूर साखर कारखान्याच्या परिसरात सध्या जुन्या बिल्डिंग हटविण्याचे काम सुरू आहे. याचदरम्यान काही कामगार बॉयलरजवळील तीन मजली इमारतीच्या छतावर चढून पत्र्याचे शेड काढत होते. अचानक दोन कामगार खाली कोसळले. अन्य कामगारांनी दोन्ही जखमी कामगारांना प्राथमिक उपचारानंतर मुरादाबाद येथे उपचारासाठी पाठवून दिले.
उपचारांदरम्यान अजीतपूरदासी येथे राहणाऱ्या अनिल कुमार (वय २६) याचा मृत्यू झाला. तर मौहाडा गावचे यशपाल सोनी याची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेत अमित याचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटूंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रोश केला. कामगाराच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई देण्याची मागणी करत ग्रामस्थ, नातेवाईकांनी कारखान्यासमोर आंदोलन केले. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आक्रोश करणाऱ्या नातेवाईकांची समजूत घातली. धामपूर साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक (प्रशासन) विजय कुमार गुप्ता यांनी कुटूंबीयांना शक्य ती मदत केली जाईल असे सांगितले. तर कारखान्याचे उपाध्यक्ष एम. आर. खान यांनीही मृत कामगाराच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत केली जाईल असे सांगितले.