लंडन : चीनी मंडी
आंतरराष्ट्रीय बाजारातील भारतीय साखरेच्या अतिरिक्त पुरवठ्याचा परिणाम लंडनच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. व्यापाऱ्यांनी उपलब्ध साखरेची विक्री केली आहे. डिसेंबरमधील दरांच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे तेथील व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
लंडनच्या बाजारातील ईडी अँड एफ मॅन होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीने जवळपास साडे तीन लाख टन प्रक्रियायुक्त पांढरी साखर सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनल लिमिटेडला विक्री केली आहे. त्यांच्याकडील बहुतांश साठा त्यांनी विकल्याचे सूत्रांनी सांगितले. टेरिओस आणि इतर दोन कंपन्यांनीही भारतीय साखरेची विक्री केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतात गेल्या वर्षी ३२३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. जगभरातील साखरेच्या अतिरिक्त पुरवठ्याला भारताना हातभार लावला. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून भारतात नवा साखर हंगाम सुरू झाल आहे. दुष्काळी परिस्थिती, उसावरील रोग यामुळं या हंगामात साखर उत्पादन थोडे घटण्याची शक्यता असली, तरी चांगले साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला, तर न्यू यॉर्कमध्ये साखरेचे दर १७ टक्क्यांनी घसरले आहे. बंपर उत्पादनामुळे अतिरिक्त पुरवठा होण्याची शक्यता असल्यामुळेच बाजारात असा परिणाम दिसत आहे. दुसरीकडे लंडनच्या बाजारत प्रक्रियायुक्त शुद्ध साखर १३ टक्क्यांनी घसरली आहे. डिसेंबरमध्ये प्रति टन ३२८.२० डॉलरपर्यंत येण्याची शक्यता आहे.
भारतातून यंदाच्या हंगामात आतापर्यंत ८ लाख ५० हजार टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. गेल्या वर्षी भारतातून झालेल्या एकूण निर्यातीपेक्षा हा आकडा जास्त आहे, अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनचे प्रफुल विठलानी यांनी दिली. यंदाच्या हंगामात भारताची साखर निर्यात वाढणार असून, ५० लाख टन निर्यातीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.