रोहतक: महम साखर कारखान्याने वाढती मागणी लक्षात घेऊन गूळ उत्पादन सुरू केले आहे. प्रशासनाने कारखान्यासमोरील पेट्रोल पंपाजवळ यासाठी स्वतंत्र विक्री केंद्र सुरू केले आहे. हा गूळ केमिकल विरहीत असल्याचा दावा कारखान्याने केला आहे.
साखर कारखान्यात गूळ बनविण्यासाठी जॅगरी युनीट तयार करण्यात आले आहे. याची क्षमता प्रतिदिन दोन टन आहे. गूळ आणि साखर विक्रीसाठी कारखान्याच्या बाहेरील पेट्रोल पंपानजीक रिटेल विक्री केंद्र सुरू करण्यात आल्याचे चिफ केमीस्ट संजीव यादव यांनी सांगितले. या केंद्रामध्ये गूळ आणि साखरेची विक्री केली जात आहे.
गूळ प्रतिकिलो ७० रुपये दराने विक्री केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडेच ही विक्री व्यवस्था करण्यात आली असून दररोज दीड ते दोन क्विंटल गुळाची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहकांच्या सोईसाठी गुळाची छोट्या आकारातील ढेप तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचे वजन एक किलो आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन सरकार आणि कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यात गूळही निर्मितीला सुरुवात केली आहे. भिवानी, हिसार, जिंद, रोहतक या जिल्ह्यांतील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन महम साखर कारखान्यात हे गूळ युनीट सुरू करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांतील शेतकरी महम साखर कारखान्याचे शेअर धारकही आहेत. साखर कारखान्यातील गूळ उत्पादनामुळे लोकांमध्येही उत्साह आहे.
सेंद्रीय उत्पादनावर भर
गावागावांत चालणाऱ्या गुऱ्हाळांच्या तुलनेत कारखान्यातील गूळ उत्पादन सेंद्रीय आहे.
या क्षेत्रातील जाणकारांनीही याची देशी चव ओळखली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल मिसळण्यात आलेले नाही. या युनीटमध्ये गूळ साखर तयार केली जात आहे.
गूळ तयार करण्याच्या कढईखाली पारंपरिक पद्धतीनेच अग्नीसंरचना करण्यात आली आहे. यासाठी बगॅसचा वापर केला जातो.
सध्यस्थितीत पेट्रोल पंपानजिकच्या विक्री केंद्रावरच गुळाची विक्री होत असून अधिक उत्पादन केल्यास त्याची विक्री अन्य शहरांमध्येही केली जाईल.
– जगदीप सिंह, कार्यकारी संचालक, महम साखर कारखाना