सातारा: केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलेले पाठबळ आणि चांगला झालेला पाऊस यामुळे देशामध्ये सलग पाचव्या वर्षी, २०२१-२२ या गळीत हंगामात अतिरिक्त साखर उत्पादन होणार आहे.
ऊसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ऊस शेतीचा विस्तार केला आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
वाढलेल्या उत्पादनामुळे भारतातील साखरेच्या साठ्यामध्ये वाढ होईल. केद्र सरकारलाही त्यामुळे साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना जाहीर करावी लागेल अशी शक्यता आहे.
विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीजचे व्यवस्थापकिय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, पुढील हंगामातील साखरेच्या उत्पादनाबाबत अंदाज लावणे शक्य नाही. मात्र, या हंगामाच्या तुलनेत ते अधिक असेल. इंडियन शुगर मिल असोसिएशनने २०२०-२१ या गळीत हंगामात ३१ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.