पुणे : चीनी मंडी
रुपयाची वधारलेली किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर या दोन्हीचा एकत्रित परिणाम भारताच्या साखर निर्यातीवर दिसू लागला आहे. भारताची साखर निर्यात मंदावली असून, बाजारपेठेला परिस्थिती बदलण्याची आशा आहे. दरम्यान, कच्च्या साखरेच्या मोठ्या करारांची अपेक्षा असणाऱ्या साखर कारखान्यांनी आता प्रक्रियायुक्त पांढरी साखर तयार करण्यास सुरुवात केली आहे.
२०१८-१९च्या हंगामात आतापर्यंत साडे आठ लाख टन साखर निर्यातीचे करार झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर निर्यातीला लगाम लागला आहे. साखरेची निर्यात करणाऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, कच्च्या साखरेचे दर घसरले आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत वधारली. त्यामुळे भारताची साखर निर्यात अपेक्षित वेगाने होत नसल्याचे दिसत आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित पवार यांनी साखरेची निर्यात थंडावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘साखर कारखान्यांच्या दराविषयीच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष निर्यातीमधून दराविषयी आलेले प्रस्ताव यात प्रचंड तफावत आहे. विशेषतः महाराष्ट्रात जिथं साखरेचा उत्पादन खर्च जास्त आहे. तेथून निर्यात होत नसल्याचे दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांत देशांतर्गत बाजारातही साखरेचा दर घसरल्यामुळं साखर कारखान्यांकडचा कॅश फ्लो कमी झाला आहे.’
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर बाजारपेठेत एम-ग्रेड साखरेचा दर गेल्या महिन्यातील ३२.५४ रुपयांवरून ३१.५० रुपये प्रति किलो असा घसरला आहे.