मुंबई : इंधनाचे दर पुन्हा नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे लोकांना आपली वाहने घेऊन फिरणेही मुश्किल होईल अशी स्थिती आहे. वाढत्या दरवाढीचा फटका जवळपास ११ हजार छोट्या वाहतूकदारांना बसला असून वाहतूक क्षेत्रातील अंधःकारमय भविष्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वाहतूकदार संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.
गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर एक रुपयाहून अधिक वाढले आहेत. पेट्रोल २४ पैशांनी वाढून ९२.२८ रुपये प्रतिलिटर तर डिझेल २६ पैशांनी वाढून प्रतिलिटर ८२.६६ पैशांवर पोहोचले. गेल्या नऊ महिन्यांत डिझेलचे दर २५ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. छोट्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसाठी
हि मृत्यूघंटाच आहे. त्यांना आपले नियमित खर्च भागवणेही कठीण होणार आहे असे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय कालरा यांनी सांगितले. आगामी काही दिवसांत संघटनेची तातडीची बैठक आयोजित करणयात आली आहे. त्यामध्ये इंधन दरवाढीविरोधात चक्काजामसारख्या आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. हे आंदोलन राज्यव्यापी असेल. यापूर्वी २०१८ मध्ये अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले होते असे उपाध्यक्ष कालरा यांनी सांगितले.
ऑल इंडिया ट्रान्स्पोटर्स वेल्फेअर असोसिएशनचे (एआयटीडब्ल्यूए) अध्यक्ष महेंद्र आर्या म्हणाले, इंधन दरवाढीमुळे राज्यातील जवळपास ११ हजार वाहतूकदारांना कोट्यवधीचा फटका बसला आहे. अनेकजण कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत तर अनेकांनी दुकानेही बंद केली आहेत. वाहतूक क्षेत्रासाठी हा अतिशय वाईट काळ आहे. कर कमी करणे, डिझेलवरील व्हॅट हटवणे, ई वे-बिलसारखे प्रश्न आमच्यासमोर आहेत. त्यांची सोडवणूक तत्काळ व्हायला हवी.
सरकारने सुरू केलेल्या किसान रेलमुळेही वाहतूक व्यावसायिकांना फटका बसल्याचे कालरा यांनी सांगितले. ते म्हणाले, रेल्वेसारख्या वाहतूक सुविधाला सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र, रस्ते वाहतूकदारांना तशी कोणतीही सवलत नाही. आम्ही अशा पद्धतीची कमी दरातील सेवा पुरवू शकत नाही. त्याचवेळी पेट्रोल पंपांवर वाढत जाणारी डिझेलची किंमत आमच्या व्यवसायाला आडकाठी ठरते.
एसयूव्ही आणि कार्सनाही वाढत्या दरवाढीचा फटका बसत आहे. सुट्टीच्या दिवसांत लोणावळा, पुणे, महाबळेश्वर, अलिबाग, इगतपूरी, नाशिक आणि अन्य पर्यटनस्थळांवर कार्समधून फिरायला जाणाऱ्यांची गर्दी रस्त्यावर दिसते. लोणावळ्याला कुटूंबीयांसह प्रवासाला निघालेले अभिषेक दास म्हणाले, पेट्रोल पंपांवरील वाढते दर पाहणे अतिशय वेदनादायी आहे. मुळात रस्त्यावरील अनियंत्रीत वाहतूक कोंडीमुळे गाडीचे मायलेज कमी मिळते. अशाच पद्धतीने जर इंधन दरवाढ सुरू राहिली तर विकेंडला शहराबाहेर फिरायला जाणेही कठीण होईल.
पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. वेंकटराव म्हणाले, कोविड १९ मुळे स्वतःच्या कारमधून सुरक्षित प्रवास करू इच्छिणाऱ्यांची गर्दी पेट्रोल पंपांवर दिसू लागली. इंधन दरवाढ झाली तरी कोरोना महामारीपासून बचावासाठी लोकांमध्ये सुरक्षित प्रवासाची जागृती दिसत आहे. मेट्रो सिटीत इंधनाचे दर सर्वोच्च स्तरावर असूनही ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचे दिसत नाही.
बाँबे गुड्स ट्रान्स्पोर्टर्स असोसिएशनचे अभिषेक गुप्ता म्हणाले, कर्जे थकल्याने काही ट्रक बँका, वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांनी जप्त कले आहेत. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यवसायाचा खर्च १५ टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिलमध्ये ६६ रुपयांवर असलेले डिझेल आता ८२ रुपयांवर पोहोचले आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे.