इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या आगामी अध्यक्षपदी येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील यांची निवड होईल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केली. साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची मुदत संपणार आहे. त्यानंतर त्यांच्या जागी पाटील हे काम पाहतील.
सांगली जिल्ह्यातील कुरळप येथे पी. आर. पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार शरद पवार यांच्या हस्ते झाला. पाटील हे गेली ५१ वर्षे सहकार क्षेत्रात आहेत. त्यापैकी २५ वर्षे अध्यक्ष आहेत. अमृतमहोत्सवी कार्यक्रमात पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात इतका प्रदीर्घ कारकिर्द असणे हे खूप अवघड आहे. माझीही लोकसभा आणि विधानसभेत ५२ वर्षांची कारकिर्द झाली आहे. सहकार क्षेत्रात पी. आर. पाटील यांचे योगदान मोठे आहे. अशा सहकारात जाण असलेल्या लोकांचीच आज गरज आहे. त्याममुळे त्यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी दिली जात आहे.
कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते.