कानपूर : कायमगंज (फारुखाबाद) साखर कारखान्यासमोरील अडचणी कायम आहेत. गुरुवारी कारखान्यातील डायनॅमिक हीटरची ट्यूब फुटल्याने कारखाना प्रशासनाला गाळप पुन्हा बंद करावे लागले. त्यामुळे ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करत कडाक्याच्या थंडीत दिवस काढावे लागत आहेत.
१९७४ मध्ये स्थापन झालेल्या सहकारी साखर कारखान्याची स्थिती प्रचंड खराब आहे. अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे गाळप बंद पडत आहे. काही दिवसांपूर्वी टँकमध्ये रस वाहून नेणारा पंप खराब झाल्याने रस सर्वत्र पसरला होता. त्यामुळे गाळप बंद करावे लागले होते. गुरुवारी पहाटे चार वाजता डायनॅमिक हीटरची ट्यूब लीक झाली. त्यामुळे गरम रस सर्वत्र पसरला. त्यामुळे कारखाना प्रशासनाने गाळप बंद केले. पसरलेल्या रसामुळे किती नुकसान झाले आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
कारखान्याच्या तांत्रिक विभागाचे कर्मचारी दुरुस्ती करीत आहेत. गरम रस वाहून नेणाऱ्या साधारणतः २५० ट्यूब असतात. यातील ५ ते ६ ट्यूब खराब झाल्या आहेत. त्या बदलण्यात येत आहेत. याबाबत कारखान्याचे सर व्यवस्थापक किशन लाल म्हणाले, ट्यूब लीक झाल्यामुळे फार नुकसान झालेले नाही. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच गाळप पुन्हा सुरू केले जाईल.
दुसरीकडे साखर कारखान्याचे गाळप बंद झाल्याने ऊस घेऊन वजनकाट्यावर आलेल्या शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीला सामोरे जावे लागत आहे. रसूलपूर येथून आलेले शेतकरी देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, अनेकवेळा कारखाना बंद पडत आहे. सरकारने अधिक क्षमतेचा दुसरा प्लान्ट सुरू करण्याची गरज आहे. गेल्या तीन दिवसांपासून आम्ही इथे आहोत. किती दिवस पुन्हा गाळप सरू व्हायला लागतील याची निश्चिती नाही. हरियालपूर येथील शेतकरी राकेश म्हणाले, वजन झालेला ऊस गेल्या दोन दिवसांपासून गाळपाविना आहे. प्लान्टमधील दुरुस्ती कधी पूर्ण होईल हे अनिश्चित आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत ट्रॅक्टरखाली रात्र काढावी लागली.