नवी दिल्ली: साखरेचे जादा उत्पादन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायचे पैसे यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीला अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, सद्यस्थितीत कंटेनरच्या तुटवड्यामुळे साखर निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
साखर उद्योगाशी संबंधीत अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, परदेशातून भारतातील साखरेचा चांगली मागणी आहे. मात्र, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक असलेल्या देशाकडे कंटेनर्सची कमतरता आहे. त्यामुळे साखरेची निर्यात मर्यादीत बनली आहे. प्रमुख साखर उत्पादक श्री रेणुका शुगर्स लिमिटेडचे अध्यक्ष रवि गुप्ता म्हणाले, भारताने जानेवारी २०२० मध्ये साधारणतः ३७०००० टन साखरेची निर्यात केली होती. मात्र, यावर्षी फक्त ७०००० टन साखर निर्यात झाली आहे. जागतिक स्तरावर जहाज वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत मागणी अधिक झाली आहे. मात्र, कंटेनरची कमतरता भासत आहे. चीनसोबतच्या तणावपूर्ण संबंधामुळे भारताच्या आयातीवर परिणाम झाला आहे. याचा अर्थ आयात होणाऱ्या मालाचे कंटेनरही कमी झाले आहेत.
गुप्ता म्हणाले, कमी दर्जाची पांढरी साखर निर्यातीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकेत मागणी चांगली आहे. मात्र, कंटेनर कमी उपलब्ध असल्याने निर्यात कमी झाली आहे.