सुल्तानपूर : जुन्या यंत्रसामुग्रीवर सुरू असलेल्या, जिल्ह्यातील एकमेव किसान सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना अडचणी वाढतच आहेत. अनेकवेळा कारखान्यात तांत्रिक बिघाडामुळे काम बंद पडत असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुधवारी रात्री कारखान्यातील आरसीबी शाफ्ट तुटल्याने पुन्हा गाळप बंद पडले.
कारखान्यातील शाफ्ट तुटल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी मुख्य व्यवस्थापक प्रताप नारायण यांना दिली. त्यांनी तातडीने कारखान्यातील इंजिनीअर्सना या शाफ्टच्या दुरुस्तीचे आदेश दिले. गुरुवारी दिवसभर कारखान्याच्या इंजिनीअर्ससह तांत्रिक विभागाचा इतर स्टाफ दुरुस्तीच्या कामात गुंतले होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत दुरुस्तीमध्ये यश आले नाही. त्यामुळे ऊसाचे गाळप बंद राहिले.
गाळप बंद पडल्याने साखर कारखान्याच्या यार्डमध्ये ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची रांग लागली. शेतकऱ्यांना उसाचे वजन न झाल्याने अडचणीला सामोरे जावे लागले. कारखान्याचे सर व्यवस्थापक प्रताप नारायण यांनी सांगितले की, शाफ्ट तुटल्याने गाळप बंद पडले आहे. त्याची दुरुस्ती सुरू आहे. तातडीने दुरुस्ती पूर्ण करून गाळप पुन्हा सुरू केले जाईल.