लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदाच, राज्य सरकाराच्या अधिपत्याखालील साखर कारखान्यांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी नियुक्त करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. राज्याचे ऊस आणि साखर उद्योगाचे अरितिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी ही माहिती दिली.
भूसरेड्डी म्हणाले, हा निर्णय राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधी मिळवून देणारा ठरणार आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून साखर कारखान्यांमध्ये व्यवस्थापन आणि कामकाजामध्ये सुधारणाही होईल. याशिवाय, राज्य सरकारने उत्तर प्रदेश राज्य साखर कारखाना कार्पोरेशनच्या अखत्यारीतील मुंडेरवा कारखाना, पिपराईच कारखाना आणि मोहिउद्दीनपूर कारखान्यामध्ये ५१ तांत्रिक अधिकारी नियुक्त करण्याचाही निर्णय घेतला आहे. या पदांमध्ये व्यवस्थापन, इंजिनीअर्स, रसायनतज्ज्ञ, लेखा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकार, ऊस व्यवस्थापकांसह प्रशासकीय अधिकारी नियुक्तीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २१ मॅनेजमेंट ट्रेनींना साखर कारखान्यांमध्ये नोकरी मिळेल.