नवी दिल्ली : मंडयांमध्ये नव्याने कांदे, बटाट्याची आवक सुरू झाल्यानंतर जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडताना दिसत नाही. बटाट्याचे दर स्थिरावले आहेत. पन्नास रुपयांवर गेलेला बटाटा सध्या १० ते १५ रुपयांवर आला आहे. मात्र गेल्या ५ दिवसांपासून कांद्याचे भाव २० रुपयांनी वाढले आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एक फेब्रुवारीच्या तुलनेत जयपूरमध्ये कांद्याचे भाव २५ रुपयांवरून
४५ रुपयांवर आले आहेत.
यादरम्यान कांद्याचे दर १५ रुपये प्रति किलो वाढले आहेत. याशिवाय मुंबई, दिल्ली, मुझफ्फरपूरसह देशातील अनेक शहरांमध्ये गेल्या पाच दिवसांत कांद्याचे दर १ रुपयापासून २० रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर रायगंज, इम्फाळ, श्रीनगर, नागपूर आणि कानपूर आदी शहरांमध्ये कांदा एक ते १० रुपयांनी स्वस्त झाला आहे.
तसे पाहिले तर देशातील बहुसंख्य शहरांमध्ये कांद्याचा किरकोळ विक्री दर २० ते ६० रुपयांपर्यंत राहीला. मात्र अनेक शहरांमध्ये हा दर ५० रुपयांवर गेला. मुंबईत एक जानेवारीला कांदा ४४ रुपयांनी विकला जात होता. तोच आता ५४ रुपयांना मिळत आहे. तर इम्फाळ, बालासोर, राहुल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडमध्ये ५० रुपये किलो आहे. जयपूर, रांची, आणि लखनौमध्येही कांदा ५० रुपयांवरच आहे.