फरुखाबाद : साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर उसाच्या तोडणीच्या स्लीप्स न मिळाल्याने कारखान्याला ऊसच पोहोचू शकला नाही. त्यामुळे साखर कारखान्याकडे पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याने कारखान्याचे गाळप बंद पडले. आता पुरेसा ऊस उपलब्ध झाल्यानंतरच कारखाना सुरू होऊ शकेल.
दी किसान सहकारी साखर कारखान्यातील या प्रकारानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ऊस केंद्रे आणि शेतकऱ्यांशी संपर्क साधून तातडीने ऊस कारखान्याला पाठविण्यास सांगितले. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नासहून अधिक वाहनांतून ऊस कारखान्यापर्यंत आला. पुरेसा ऊस आल्यानंतर लगेच गाळप सुरू करण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले. लुधईया, भकुसा, कपील, सोतेपूर, अहमद्गज आदी ठिकाणाहून शेतकरी ऊस घेऊन आले होते. ज्यांची लागण आधी आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे. तरच गाळप योग्य पद्धतीने सुरू राहील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऊस ग्रामसेवकाला कोणत्या शेतकऱ्याकडे किती ऊस उपलब्ध असतो याची माहिती असते. जर वेळेवर ऊसाची तोडणी स्लीप मिळाली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती असे शेतकऱ्यांनी सांगितले. कारखान्याचे गाळप बंद पडल्याने शेतकऱ्यांसह कारखान्यालाही मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात आले.