नवी दिल्ली : भारतासह जगभरातील १९० हून अधिक देशांना कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र भारतासह काही देश यातून सावरू लागले आहेत. कोरोनाची रोजची रुग्ण संख्या कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत भारतात नवे ९११० रुग्ण आढळले आहेत. याशिवाय १४ हजार ०१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ७८ जणांचा मृत्यू झाला आहे.
एकूण कोरोना रुग्णांची संख्या पाहता १ कोटी ०४ लाख ८७ हजार ३०४ लोक संक्रमित झाले आहेत. त्यापैकी १ कोटी ०५ लाख ४८ हजार ५२१ बरे झाले आहेत. तर १ लाख ५५ हजार १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १ लाख ४३ हजार ६२५ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६२ लाख ५९ हजार ८ जणा़ंना लस देण्यात आली आहे.
याशिवाय कोरोना महामारी विरोधात लढाईत भारताकडून शेजारच्या देशांना लसीची मदत केली जात आहे. रविवारी अफगाणिस्तानला पाठवलेल्या लसीची पहिली खेप पोहोचली. भारताने अफगाणिस्तानला एक्स्ट्राजेनेको या लसीचे ५००००० डोस पाठवले आहेत.
विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करून माहिती दिली की, मेड इन इंडिया व्हॅक्सिन अफगाणिस्तानला पोहोचली आहे. आम्ही नेहमीच आमच्या दोस्तांसोबत आहोत. भारताने आतापर्यंत १५ देशांना कोविड १९ ची लस दिली असून आणखी २५ देशांसोबत बोलणी सुरू आहेत.