नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात साखरेच्या किंमती जागतिक स्तरावर गेल्या तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या. मात्र, आता त्यामध्ये घसरण झाली आहे. दरम्यान कंटेनर तुटवड्याचा कच्च्या साखरेच्या निर्यातीवर परिणाम झालेला नाही असे सूत्रांनी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार, इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, थायलंडसारखे कमी साखर उत्पादन करणारे देश भारतासाठी फायदेशीर ठरले आहेत. थायलंडमधील साखर अद्याप बाजारात येण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, तेथील उत्पादन या हंगामात खूपच कमी झाले आहे. दोन वर्षांपूर्वी थायलंडमध्ये सुमारे १४ मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी हेच उत्पादन घटून ८ ते ८.५ मिलियन टनावर आले. यंदा त्यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. जर हे उत्पादन ७ मिलियन टनापेक्षा कमी आले तर साखरेचा दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार असलेल्या भारताला इंडोनेशिया, मलेशिया अशा पारंपरिक थायलंडच्या बाजारात निर्यातीची संधी मिळू शकेल.
महासंचालक अविनाश वर्मा म्हणाले, जागतिक स्तरावर साखरेच्या किमती अत्युच्च स्तरावर आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त निर्यातीचा आमचा प्रयत्न राहील. पांढऱ्या साखरेच्या निर्यातीसाठी कंटेनर अपुरे असल्याची वस्तूस्थिती आहे. मात्र, कच्च्या साखरेबाबत अशी स्थिती नाही. आम्ही कंटेनरचा यासाठी उपयोग करत नसल्याने कंटेनर कमतरतेचा या निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे वाणिज्य आणि खाद्य मंत्रालयासोबत नुकतीच आमची एक बैठक जाली. आम्ही कंटेनरची प्रतीक्षा करण्याऐवजी घाऊक पद्धतीने पांढऱ्या साखरेची निर्यात करू शकतो का याविषयी चर्चा करण्यात आली.
वर्मा म्हणाले, कंटेनरची कमतरता हा निर्यातीमधील एक अडसर आहे. मात्र, व्यक्तिगत स्तरावर मला असे वाटते की आपण आपल्या उद्दीष्टीनुसार निर्यातीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपण सर्वाधिक निर्यात कच्च्या साखरेची करतो. त्यास अडचण येईल असे मला वाटत नाही.