एफआरपी कायदा मोडणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करा: माजी खासदार राजू शेट्टी

पुणे : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसाच्या एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. अनेक साखर कारखान्यांनी एफआयपी कायदा मोडला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिलेली नाही. अशा कारखान्यांची साखर तत्काळ जप्त करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

माजी खासदार शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी अनेक साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या एफआरपीमधील काही रक्कम शेतकऱ्यांना अद्याप दिली नसल्याचे त्यांनी साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, ज्या साखर कारखान्यांनी ३० टक्क्यांहून अधिक एफआरपीच्या रक्कमेचे वितरण केलेले नाही अथवा ज्या साखर कारखान्यांनी मुदतीत शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही, अशा कारखान्यांवर महसूल अधिनियमांतर्गत (आरआरसी) साखर जप्त करण्याची कारवाई केली जाईल.
चर्चेवेळी माजी खासदार शेट्टी यांनी साखर उतारा घटल्याबाबतही मुद्दा उपस्थित केला. बी हेवी मोलॅसीसच्या वापराने इथेनॉल बनविणाऱ्या साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा एक ते दीड टक्क्यांनी कमी येतो. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. साखर कारखान्यांनी एफआरपीसोबतच अतिरिक्त पैसे देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळले पाहिजेत. याबाबतही साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्यांना आदेश द्यावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here