नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रणाचे स्वीकारलेले धोरण ही खूप महत्त्वाची बाब आहे असे इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले. कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी झाल्या असल्या तरी सरकारने त्याचा परिणाम इथेनॉलच्या किमतीवर होऊ दिलेला नाही असे ते म्हणाले.
वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने इथेनॉल उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी व्याजात सवलतीची योजना आणली आहे. सरकारने साखर उद्योगाला ऊसाचा रस आणि बी हेवी मोलॅसीस हे इथेनॉलमध्ये हस्तांतरीत करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे साखर कारखाने इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी गतीने काम करीत आहेत.
वर्मा यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, इस्मा अतिरिक्त साखरेचे उत्पादन दरवर्षी २० लाख टनाने कमी करण्यासाठी एक योजना राबविणार आहे. २०२३ पर्यंत आम्ही उसाचे डायव्हर्शन करून अतिरिक्त साखर उत्पादन शून्यावर आणू असा विश्वास आम्हाला वाटतो.