नवी दिल्ली : चीनी मंडी
जगातील पहिल्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून बिरूद मिरवणाऱ्या ब्राझीलला मागे टाकण्याची तयारी भारताने केली आहे. यंदा भारत ब्राझीलला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर झेप घेणार असल्याचे मत अमेरिकेच्या विदेश कृषी सेवा विभागाने व्यक्त केले आहे. गेल्या सोळा वर्षांत पहिल्यांदाच भारत ही किमया साधणार आहे.
वाढलेले ऊस क्षेत्र आणि त्यातील उसाची स्थिती यांमुळे भारतातील साखर उत्पादनात यंदा ५.२ टक्क्यांनी वाढ होईल आणि उत्पादन ३५९ लाख टनापर्यंत पोहचेले असा अंदाज, अमेरिकेच्या विदेश कृषी सेवा विभागाने व्यक्त केले आहे. त्याचवेळी ब्राझीलमधील साखर उत्पादन २१ टक्क्यांनी घसरणार आहे. इथेनॉल उत्पादनाकडे वळवलेला ऊस आणि हवामानाचा लहरीपणा यांमुळे ब्राझीलमधील साखर उत्पादन ३०६ लाख टनांपर्यंत मर्यादीत राहण्याची शक्यता आहे.
जगातील एकूण साखर उत्पादनाचा विचार केला, तर त्यात ४.५ टक्क्यांची घसरण दिसत आहे. मे महिन्यात एकूण उत्पादन १ हजार ८८० लाख टन होण्याचा अंदाज होता. पण, ब्राजील बरोबरच युरोपीय देश आणि थायलंडमधील स्थिती पाहिली तर उत्पादन १ हजार ८५० पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. ब्राझील उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर येणार असला तरी निर्यातीमधील त्यांचे पहिले स्थान कायम राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर थायलंड असेल. ब्राझीलसाठी एप्रिल ते मार्च हा वितरण आणि मार्केटिंगचा काळ असतो. तर भारतासाठी ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असणार आहे. इतर अनेक देशांमध्ये हा हंगाम मे ते एप्रिल असतो. भारतातून चीन आणि युरोपला कमी पुरवठा होत असल्याने साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे मत अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केले आहे. दुसरीकडे या वर्षी न्यूयॉर्कच्या बाजारात कच्च्या साखरेचे दर १८ टक्क्यांनी घसरले आहेत तर गेल्यावर्षी ही घसरण २२ टक्क्यांनी झाली होती